Pimpri: नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

Share This News

पिंपरी, दि. १६ सप्टेंबर २०२२ :- सतत पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असन त्यातून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणी पातळीची वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे असे आदेश देखील त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

[ad id=’18699′]

सद्यस्थितीत पाऊस जास्त प्रमाणात पडत आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. शिवाय धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या वस्तू तसेच जनावरांची काळजी घ्यावी. संभाव्य धोका विचारात घेता कोणीही नदीपात्रात उतरू नये अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना केल्या आहेत.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अणु विद्युत व दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॅामस न-होना हे शहरातील अनेक धोकादायक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून धरणाच्या सांडव्याद्वारे विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या असणाऱ्या शहरातील वस्त्यांमध्ये महानगरपालिकेचे पथक बारकाईने लक्ष ठेवून असून तेथे आवश्यक आपत्कालीन यंत्रणा देखील तैनात ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता पूरपरिस्थिती उद्भवल्यावर नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.

[ad id=’18427′]

आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणा-या सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पुर नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष २४ X ७ कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यूसाठी घटनास्थळी एनडीआरएफ तसेच पोलीस यांच्याशी समन्वय साधून त्यांना पाचारण केले जाणार आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी दिली.

[ad id=’18429′]

संभाव्य धोका लक्षात घेता अग्निशमनचे कर्मचारी शहरात अनेक ठिकाणी फिरतीवर आहेत. रात्रीच्या वेळी देखील पावसामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास शहरात अग्निशमन यंत्रणा सज्ज असून अग्निशमनची टीम रेस्क्यूसाठी आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी २४ X ७ कार्यान्वित आहेत, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी दिली.