River Water Pollution: चला जाणूया नदीला अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

Share This News

पुणे, दि. 18 : ‘चला जाणूया नदीला’ अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृतीवर भर देण्याची तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विषयाचे महत्व समजावून सागण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यावेळी देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, संतोष सांगळे, जलबिरादरीचे महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र चूग, शैलजा देशपांडे, सारंग यादवडकर आदी उपस्थित होते.

[ad id=’19552′]

देशमुख म्हणाले, गेल्या काही वर्षात अनावृष्टी व अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळ आणि पूरासारख्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवणे आवश्यक आहे. हे कार्य करताना नागरिकांना सोबत घेऊन रचनात्मक कार्यक्रमांची आखणी करावी लागेल. समस्येच्या मूळाशी जाऊन टप्प्याटप्प्याने त्या दूर करण्यासाठी सर्व संबधित घटकांना सोबत घेऊन नियोजन करावे लागेल. अभियान राबविताना यात सहभागी सर्व घटकांनी सर्वसमावेशक विचार करावा आणि आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

चूग म्हणाले, या अभियानासाठी प्रशिक्षित जलनायक, जलयोद्धा, जलकर्मी, तालुका स्तरावरील जलदूत, ग्रामस्तरावरील जलसेवकांचे सहकार्य मिळणार आहे. याशिवाय विषयाशी संबंधित शासकीय विभाग, सामाजिक संस्था, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचाही यात सहभाग असणार आहे. शासन आणि नागरिक मिळून नद्यांचा अभ्यास आणि त्या खऱ्या अर्थाने अमृतवाहिनी ठराव्यात यासाठी उपाययोजना करण्यात येईल. पुणे जिल्ह्यातील राम नदी, मुळा, मुठा, पवना, घोड नदी, मीना, भीमा, वेळगंगा, इंद्रायणी अशा 9 नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चोपडे यांनी अभियानाविषयी माहिती दिली. पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्या सहकार्याने अभियान राबविण्यात येणार आहे. नद्यामधील प्रदूषण दूर करणे, नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, नागरिकांना जलसाक्षर करण्यासाठी उपक्रम राबवणे, पावसाचे पाणी अडवून भूजलस्तर उंचाण्याचे प्रयत्न करणे, नदीच्या प्रवाह जैवविविधतेबाबत माहिती देणे, नदी किनाऱ्यावरील अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण अशा तीन प्रमुख कारणांचा अभ्यास करून त्याचा परिणाम अभ्यासण्यावर अभियानात भर देण्यात येणार आहे. नदी, समाज आणि शासन यात सुसंवाद स्थापीत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यादवडकर, श्रीमती देशपांडे आणि सामाजिक संस्थांच्या इतर प्रतिनिधींनीदेखील यावेळी अभियानाला सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त करताना आपले विचार व्यक्त केले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Follow this link to join my WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/KSk73FAmlH78ARQf02T9dG