Khadki Terminal: खडकी टर्मिनल बाबत रेल्वे अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

Share This News

पुणे ता.१८ प्रतिनिधी : पुणे स्टेशनवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खडकी येथे नवीन टर्मिनस व्हावे अशी सूचना खासदार गिरीश बापट यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली होती. याबाबत आज रेल्वेचे अधिकारी तसेच लष्करी अधिकारी यांनी संयुक्तिकरित्या खडकी रेल्वे स्टेशनची पाहणी केली.

यामध्ये मध्यरेल्वे बोर्डाचे जनरल मॅनेजर अनिल लाहोटी, प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन्स मॅनेजर मुकुल जैन, मुख्य व्यवस्थापक मनजित सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापिका रेणू शर्मा, पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय संचालन डॉ.स्वप्नील नीला आदी अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

[ad id=’19552′]

शहरातील दळण –वळण सुविधा वाढवून त्याचा शहरावर होणारा ताण कमी करण्यासाठी खासदार गिरीश बापट प्रयत्नशील आहेत. म्हणूनच शहराच्या मध्यभागी असलेल्या पुणे स्टेशनचा भार कमी करण्यासाठी त्यांनी हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणे तसेच खडकी येथे नवीन रेल्वे टर्मिनल तयार करणे हे उपाय सुचवले आहेत. याबाबत त्यांनी संसदेत मागणी करून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार ही केला आहे.गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही त्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांच्या सूचनेवरून आज हा पाहणीदौरा आयोजित केला होता.

या पाहणी दौऱ्यात प्रामुख्याने या मुद्यांवर चर्चा झाली, खडकी यार्ड येथे पूर्वी लष्कराच्या वापरासाठी रेल्वे रूळ बांधण्यात आले होते. मात्र २०२१ पासून लष्कराने याचा वापर बंद केला होता. लष्कर वापरत नसलेले हे रेल्वे रूळ रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची तयारी लष्कराने दर्शवली आहे. त्यानुसार याबाबत प्रस्ताव विकसित करून मार्च २०२२ मध्ये रेल्वे मुख्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लष्कराच्या वापरासाठी पर्यायी व्यवस्थेसह जमिनीचा आणि या रेल्वे लाईन्सचा प्रश्न सोडवण्यासाठी अभियंता विभाग आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याबद्दल आज चर्चा झाली. येथे रेल्वे येण्यासाठी आणि जाण्यासाठी सिग्नल यंत्रणा नाही ही सुविधा विकसित करण्यासाठी जनरल मॅनेजर लाहोटी यांच्याशी चर्चा झाली. कोचिंग ट्रेन्ससाठी पॅसेंजर प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित मालवाहू शेड प्लॅटफॉर्मचा वापर करून टर्मिनल सुविधेसाठी काम प्रस्तावित असल्याची माहीती देण्यात आली. खासदार बापट यांच्या इच्छेनुसार, नवीन टर्मिनल सुविधा विकसित करण्यासाठी मेन प्लॅटफॉर्म आणि सध्याच्या मुख्य मार्गाच्या रुळाला लागून किमान २००० मीटर लांब आणि ३०० मीटर रुंद जमीन आवश्यक असल्याची चर्चा ही झाली.