Pune: वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडले नाहीत- जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Share This News

पुणे, दि.४- नुकत्याच (३० सप्टेंबर रोजी) झालेल्या वादळी पावसादरम्यान वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले असले तरी या वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे अथवा नस्त्या उडाल्या नाहीत, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तुमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार विंग आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ विंगमध्ये विविध कार्यालये ‘क’ विंगमध्ये जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची दालने व ३५० आसन क्षमतेचे प्रेक्षागृह आणि ‘ड’ विंगमध्ये ४ मजली वाहनतळ अशा इमारती आहेत. वाहनतळाच्या इमारतीमधून कर्मचारी व अभ्यागतांना विविध कार्यालयामध्ये येण्यासाठी ५ मजल्यावर कॉरीडॉर्स ची व्यवस्था केलेली आहे. सदर कॉरीडॉर्स च्या आर.सी.सी स्लॅबखाली आभासी छत (फॉल्स सिलींग) केलेले आहे.

[ad id=’19146′]

कॉरीडॉर्स दोन्ही बाजूस ५ मजली असून ३ मी रुंदीचे आहेत व आभासी छताचे एकूण क्षेत्रफळ ८ हजार चौरस फूट आहे. आभासी छतामध्ये ६० सें.मी. बाय ६० सें.मी. आकाराचे पॅनल्स हे अल्युमिनियम फ्रेमवर तंरगते म्हणजेच आवश्यक तेव्हा काढता येण्यासारखे ठेवलेले असतात. आरसीसी छत व आभासी छत यामधील सेवा वाहिन्याच्या देखभालीच्यादृष्टीने सदरचे पॅनल्स हे अडकवलेल्या स्थितीत ठेवलेले असतात.

 

३० सप्टेंबर २०२२ रोजी आलेल्या वादळामध्ये वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे या आभासी छताचे बरेचसे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले. सदरचे पॅनल्स वादळात उडतानाची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित (व्हायरल) झाली. वादळात उडणारे पॅनल्स नसून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नस्ती (फाईल्स) उडाल्या असा गैरसमज सर्वत्र पसरला. तथापि, या वादळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कागदपत्रे, फाईल्स उडाल्या नाही तसेच इमारतीस कुठेही बाधा पोहोचलेली नाही.

आता कॉरिडॉर्समधील सर्व आभासी छत फ्रेमवर्कसह व्यावस्थितरित्या काढून घेण्यात येतील. त्यातील क्षतिग्रस्त झालेले पॅनल्स वगळता उर्वरित चांगले पॅनल्स सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नजीकच्या भविष्यात बांधकामे प्रगतीत असलेल्या इमारतींच्या कार्यालयीन कक्षामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी वापरण्यात येतील.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सदर आभासी छतामध्ये असलेले विद्युत संच हे आरसीसी छताच्या तळाशी जोडून घेण्यात येत आहेत. तसेच छताच्या तळभागास पांढरा रंग देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या इमारतींच्या बांधकामामध्ये कॉरीडॉर्स तसेच खुले पॅसेजेसच्या ठिकाणी आभासी छताची उभारणी न करण्याची दक्षता घेण्यात येत आहे, असे सां.बा.प्रादेशिक विभाग पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी कळवले आहे.