Share This News

मी स्नेहा पोतदार. मी जर्मन भाषा घेऊन BA केले आहे. सध्या तरी मी एक आयटी प्रोफेशनल आहे. काही दिवसांपुर्वी मला जाणवलं की मला मराठीमधुन खुप चांगलं व्यक्त होता येतं आणि आवडतं सुद्धा. माझं लिखाण तुम्हाला आवडेल अशी आशा!

?

1Q84 पुस्तकावरील लेखानंतर ह्यावेळी मी घेऊन आलीये थोडा सकारात्मक ऊर्जा देणारा लेख. आशा करते तुम्हाला हा लेखही तितकाच आवडेल.

#सब_इधर_रहता_हैं (It’s all in your head!) 
वपुंचं “प्रेममयी” पुस्तक वाचताना खालील ओळी समोर आल्या आणि मला २ प्रसंग आठवले:
अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा: “मी आहे, तसा आनंदात का नाही? आपण सातत्यानं  कसला विचार करत असतो? जसे आहात, तसे तुम्ही आनंदात का नाही? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का? जो आज आनंदात नाही, तो उद्या खरोखर आनंदात राहू शकेल का?

[ad id=’4738′]

ह्यावरून पहिला प्रसंग आठवला तो माझ्या शाळेचा. मी शाळेत असताना खुप लाजरी बुजरी होते (असं मला तरी वाटतं).  शाळेतल्या कुठल्याच एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमधे मला भाग घेण्यात काहीच रस नसायचा. एकदा आमच्या टीचर ने वर्गात घोषणा केली कि हिंदी वक्तृत्व स्पर्धेत ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी कळवावे.  त्या वेळी  माझ्या शेजारी बसलेल्या मुलीने ( दुर्दैवाने मला तिचं नाव  लक्षात नाही ) मला ह्या स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहित केलं. स्पर्धा तर उत्तमच झाली. काही दिवसांनी शाळेतल्या असेम्बलीमधे आमच्या प्रिंसिपल मॅडमने माझं नाव विनर म्हणुन घोषित केलं. आधीच कधी नव्हे तो कुठल्यातरी स्पर्धेत भाग घेणाऱ्या मला,  स्वतःच नाव ऐकुन खूपच भारी वाटलं. ग्राउंडवर मी खूप मागे बसले होते, त्यामुळे स्टेजकडे जाण्यासाठी मला पळत जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मी जशी बक्षीस घेण्यासाठी उठून पळत सुटले तसा ग्राउंडवर बसलेल्या सगळ्या मुलांमध्ये एकच हशा पिकला. सगळी मुले खुप जोरात हसत होती आणि टाळ्या वाजवत होती. सगळे माझ्यासाठी एवढे चिअर करताहेत हे पाहुन मला अजुनच भारी  वाटत होतं. तसंच माझ्यासारख्या “नॉट सो पॉप्युलर” मुलीबद्दल सगळ्यांना इतकं कसं कौतुक वाटतंय ह्याचं आश्चर्य पण वाटलं. नंतर मी जेव्हा बक्षीस घेऊन जागेवर आले तेव्हा माझ्या मागे बसलेल्या माझ्या मैत्रिणीने, माझ्या मागे स्कर्टला अडकवलेली सुतळी दाखवली आणि सॉरी म्हणाली. ती सुतळी  मी जशी पळत सुटले तशी माझ्या मागे लटकत हलत होती आणि त्यामुळेच सगळी मुले हसत होती. हे ऐकुन मला त्या मैत्रिणीचा राग तर आलाच पण पुढचे दोन दिवस हा प्रसंग आठवुन मला खुप वाईटही वाटत होतं.

दुसरा प्रसंग माझ्या ऑफिसमधला.  मी आणि माझी खास मैत्रीण एकाच टीममध्ये होतो. तिला आमच्या प्रोजेक्टकडुन जर्मनीला जायची संधी आली. का कुणास ठाऊक पण तिच्याहुन जास्त आनंद मलाच झाला होता. मी ह्याआधी जर्मनीला जाऊन आले होते आणि माझ्या मैत्रिणीची ही पहिलीच संधी होती म्हणुन असेल कदाचित. तर ह्या ना त्या कारणाने तिला व्हिसा करण्यात खुप अडथळे येत होते. क्लायंटला दिलेली तारीख जवळ येत असल्याने अजुनच टेन्शन वाढलं होतं. शेवटी वैतागुन माझी मैत्रीण मॅनेजरला सगळे प्रॉब्लेम्स सांगायला गेली तेव्हा तो म्हणाला, “टेन्शन घेऊन काय उपयोग”,… आणि मस्ताकाकडे बोट दाखवत म्हणाला, ” सब इधर रहता हैं!” हे ऐकुन माझ्या मैत्रिणीचं टेन्शन  एकदमच हलकं झालं. तिने नंतर येऊन ही गोष्ट मला सांगितली. त्या वेळचा हा प्रसंग आणि माझ्या मॅनेजरने  म्हटलेलं हे वाक्य माझ्या इतकं डोक्यात बसलंय की कधी असा  काही प्रसंग माझ्या आयुष्यात आला तर मी हीच थेअरी वापरते.

[ad id=’1730′]

आज माझा तो शाळेतला प्रसंग आठवला कि वाटतं वपु म्हणतात ते बरोबर. आपण सतत कसला विचार करत असतो? आज वाटतं कि माझ्यावर कसे सगळे हसले हेच डोक्यात ठेऊन, मला पाहिलं बक्षीस मिळालं आहे ह्याचा आनदं मी उपभोगायचाच  विसरले.  मी ह्या निगेटिव्ह गोष्टीचा त्यावेळी  इतका विचार केला कि ती अजूनही माझ्या डोक्यातुन जात नाहीये.

ऑफिसमधला जो किस्सा मी  सांगितला त्यावर माझ्या मॅनेजरचं जे वाक्य होतं तेच वपु सांगतात, “उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का?” त्यावेळी माझी मैत्रीण रिलॅक्स झाली म्हणुन ती वर्तमानात रिलॅक्समध्ये जगु  शकली.

वपु पुढे म्हणतात: उद्याचा मुळारंभ आताच्या क्षणात आहे. म्हणजे जे शाश्वत आहे, ते कायम शाश्वतच  राहणार आहे.
“Nothing has happened and nothing will happen.
What is there, is there.”

आता तुम्ही म्हणाल,  झालं का हिचं लेक्चर सुरु. पण मला वाटतं, हे वाचुन एका जरी माणसाचं टेन्शन हलकं झालं असेल तरी माझं लिखाण सार्थकी लागलं म्हणायचं, नाही का?